औरंगाबादच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार

0

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

* औरंगाबाद जिल्ह्यातील समस्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या जाणून

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. औरंगाबादच्या विकासाला प्राधान्य आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींना दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक पार पडली.

श्री. ठाकरे म्हणाले, सिल्लोड येथील पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पूर्णा नदीवरील अतिरिक्त बॅरेजेसबाबत सर्वेक्षण करण्यात येईल. पीक ‍विमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल.

मराठवाडा विभागातील शाळांची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने यासाठी लागणाऱ्या अंदाजे एक हजार 300 कोटी रुपयांच्या निधीसाठी वर्गवारी करून टप्प्याटप्याने कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर शाळांचा विकास करण्यासाठी उद्योजकांच्या सहकार्यातून सीएसआर निधीचा देखील विचार करावा लागेल, यासाठी उद्योजकही पुढे येतील.

पर्यटन, दळणवळणासाठी आवश्यक असणाऱ्या औरंगाबाद- शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येईल. लोकप्रतिनिधींनी औद्योगिक विकासासाठी मागणी केलेल्या प्रकल्पांचा विचार करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येईल. औरंगाबाद उद्योग नगरी असल्याने औरंगाबादेतून जाणाऱ्या द्रूतगती मार्गाच्या आजूबाजूस ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर उभारण्याबाबतही विचार करण्यात येईल.

पैठण येथील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आणून पर्यटक, भाविकांसाठी ते खुले करण्याबाबत, दौलताबाद टी पॉइंटजवळ आवश्यक असणारा बायपास रस्ता, औरंगाबादेत प्रस्तावित असलेले 200 खाटांचे महिला व बाल रुग्णालय याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सर्वश्री सत्तार, दानवे, शिरसाट, सावे, बागडे, बंब, बोरनारे, राजपूत यांनी मतदारसंघातील प्रश्न श्री. ठाकरे यांच्यासमोर मांडले. श्री. ठाकरे यांनी त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य ती नोंद घेतली आहे, असे सांगून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक विकासकामांबाबत योग्य दखल घेण्यात येईल, असे सांगितले.

पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनीही औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या.

श्री. टोपे, श्री. भूमरे, श्री. सत्तार यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. लोकप्रतिनिधींनीही वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. त्यावर श्री. ठाकरे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

सुरूवातीला जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्री. केंद्रेकर यांनीही जिल्ह्यातील प्रश्नांबाबत श्री. ठाकरे यांना सविस्तर माहिती सादर केली.

बैठकीस उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाषदेसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्रीसंदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विविध विभागाचे प्रधान सचिव, सचिव, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आदींसह जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्रमुख यांची उपस्थिती होती.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech