अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार, करियर प्रशिक्षण राबवा

0

मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि करियर प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विविध रोजगार आणि करियर विषयक प्रशिक्षण राबविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत श्री.पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

यावेळी श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व हक्काचा रोजगार देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेणार आहेत.

सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण – प्रशिक्षणास लागणारी प्रत्येक मदत करण्यास कटिबद्ध आहे; परंतु एवढ्यावर न थांबता प्रत्येक विद्यार्थी स्वयंभू व करिअरच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा, बेरोजगारीला आळा घालता यावा यासाठी बार्टी व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात येत आहेत. तीन लाख विद्यार्थ्यांना या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.

            एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, एम.बी.ए, बँकिंग, रेल्वे, पोलीस, सैन्य दलातील विविध विभाग यांना अनुसरून विशेष अभ्यासक्रम निश्चित करून प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले जातील. त्याचप्रमाणे उद्योगांच्या निकडीनुसार स्किल डेव्हल्पमेंट कार्यक्रम हाती घेतला जाणार असुन शेतीविषयक प्रशिक्षणाची योजना आहे. जेणेकरून अनुसूचित जातीतील सुशिक्षितांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खात्रीचा रोजगार मिळेल. याबाबत येत्या ६ तारखेला बार्टीच्या अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक घेऊन निर्णय निश्चित केला जाईल, अशी माहितीही श्री. मुंडेनी दिली.

जपान देशात जपानी भाषा येणाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याच विभागातर्फे जपानी भाषा शिकवणारे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरु करुन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात हक्काची नोकरी मिळवुन देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.

या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेल्या विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

                                                                                        …..

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech